गडचिरोलीचा स्वतंत्र ब्रँड विकसित करा

गडचिरोलीचा स्वतंत्र ब्रँड विकसित करा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

क्रॉपसॅप, पीएमएफएमई व कपास कांती अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा व आढावा सभा संपन्न

गडचिरोली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
गडचिरोली (प्रतिनिधी) दि. १५ जुलै :प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन करून त्यांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्याचा स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड विकसित करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत आयोजित पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) आणि कपास कांती अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा व आढावा सभेत ते मार्गदर्शन करत होते.

यावेळी त्यांनी कृषी विभागातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना त्यांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यशाळेत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, क्रॉपसॅप, कपास कांती अभियान, ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड (AIF) तसेच शेतीतील डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी सांगितले की, खरीप हंगामाच्या तयारीसाठी आयोजित ही कार्यशाळा कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेचे सक्षमीकरण, पीक संरक्षणाबाबत वेळेवर मार्गदर्शन, कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन आणि ग्रामीण भागात अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नोडल अधिकारी तथा कृषी उपसंचालक श्रीमती मधुगंधा गौतम-जुलमे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची कार्यपद्धती, उद्दिष्टे, लाभार्थ्यांना उपलब्ध सुविधा आणि अंमलबजावणीची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली.

तसेच विस्तार विभागाचे तांत्रिक अधिकारी श्री. गणेश दुरंदे यांनी क्रॉप्स २.०’ ॲपच्या वापराबाबत तांत्रिक सादरीकरण करत डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पीक पाहणी, माहिती संकलन आणि शेतकऱ्यांपर्यंत तांत्रिक सल्ला अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याची प्रक्रिया स्पष्ट केली.

या कार्यशाळेमुळे खरीप हंगामातील पीक व्यवस्थापन, कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला अधिक चालना मिळणार असल्याचा विश्वास उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

गडचिरोलीचा स्वतंत्र ब्रँड विकसित करा

InfoNewsUpdate24 Telegram

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *