एटापल्ली नक्षल बातमी (1)

एटापल्लीत नक्षलवादी बॅनर व पत्रके आढळल्याने खळबळ; खाण प्रकल्पांना विरोध, पोलिसांची शोधमोहीम

📍 एटापल्ली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंडम गावाजवळ नक्षलवादी आशयाचे बॅनर आणि पत्रके आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बॅनर व पत्रके जप्त केली. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली असून जंगल परिसरात व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

पत्रकांमध्ये विविध खाण प्रकल्प आणि संबंधित कंपन्यांचा उल्लेख करत त्यांच्या कामकाजाला विरोध दर्शविण्यात आला आहे. काही कंपन्यांचे प्रकल्प तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली असून ग्रामस्थ, सरपंच आणि स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पांविरोधात एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकांमध्ये “जल , जंगल आणि जमीन” या मुद्द्यावर भर देत खाण प्रकल्पांमुळे स्थानिक आदिवासींचे हक्क आणि तरुणांचे भविष्य धोक्यात येईल, असा दावा करण्यात आला आहे. तसेच कंपन्यांना सहकार्य करणाऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आल्याचे समोर आले आहे.

याशिवाय हेटळकसा–कुदरी–मोहरली परिसरातील प्रस्तावित खाण प्रकल्प, तसेच नेचरल्स कंपनी, JSW समूहाच्या प्रकल्पांसह इतर सर्वेक्षण कामांनाही विरोध नोंदविण्यात आला आहे. संबंधित ड्रोन सर्वेक्षण तात्काळ बंद करण्याची मागणीही पत्रकांमधून करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांत सुरक्षा दलांच्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे गडचिरोलीतील नक्षलवादी हालचालींवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळाल्याचा दावा केला जात असतानाच पुन्हा एकदा अशा प्रकारचे बॅनर आणि पत्रके आढळल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. पोलिसांनी जप्त साहित्याची तपासणी सुरू केली असून या प्रकरणामागील सत्यता आणि संबंधितांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.

click

click

एटापल्ली नक्षल बातमी (1)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *