एटापल्ली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
एटापल्ली (प्रतिनिधी) दि. १९ जुलै : एटापल्ली तालुक्यातील सेवारी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार व प्रशासकीय अनियमिततांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एटापल्ली तालुका कार्यकारी अध्यक्ष मनीष दुर्गे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सातत्याने केलेल्या संघर्षाला अखेर यश आले असून, संबंधित ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईनंतर जारावंडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक व्यवहार, विकासनिधीचा वापर तसेच विविध विकासकामांतील अनियमिततेची स्वतंत्र, निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एटापल्ली तालुका कार्यकारी अध्यक्ष मनीष दुर्गे, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात जारावंडी ग्रामपंचायतीत कार्यरत ग्रामसेवकाच्या कार्यकाळातील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी, संबंधित अभिलेखांची तपासणी तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात दोन्ही ग्रामपंचायतींतील विकासकामे व आर्थिक व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, तसेच ग्रामस्थांच्या प्रलंबित प्रशासकीय प्रश्नांचे तातडीने निराकरण करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एटापल्ली तालुका कार्यकारी अध्यक्ष मनीष दुर्गे यांनी संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

