५ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान राज्यभर विशेष अभियान; मानसिक आरोग्यासाठी ‘मानस’ पुस्तिकेचेही प्रकाशन
मुंबई | प्रतिनिधी | Info News Update 24
मुंबई , दि. २० जुलै : राज्यातील प्रत्येक बालकापर्यंत आरोग्य, शिक्षण, पोषण आणि सामाजिक सुरक्षेच्या योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात तसेच बालकांना त्यांच्या हक्क व अधिकारांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने राज्यात ‘बालस्नेही ग्रामपंचायत’ आणि ‘बालस्नेही प्रभाग’ ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली.
महिला व बालविकास विभागाच्या पुढाकारातून ५ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ग्रामीण आणि शहरी भागात विशेष अभियानाच्या स्वरूपात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे बालकांना त्यांच्या हक्क, अधिकार आणि संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या विविध यंत्रणांची माहिती देण्यात येईल. तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत राज्य बाल हक्क आयोगामार्फत बालकांच्या मानसिक आरोग्य, मूल्यसंस्कार आणि जीवनकौशल्य विकासासाठी तयार करण्यात आलेल्या ‘मानस’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याशिवाय पालघर जिल्ह्यातील ५० शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या ‘मानस’ प्रकल्पा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या मानसिक आरोग्य कीटचे उद्घाटनही मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मंत्री तटकरे यांनी सांगितले की, बालकांना सुरक्षित, सशक्त आणि सक्षम वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासन विविध स्तरांवर काम करत असून, नव्या अभियानामुळे बालहक्कांविषयी जनजागृती वाढण्यास तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बालकेंद्रित विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.

- एटापल्ली तालुक्यात झाड कोसळल्याने रस्ता बंद; रुग्णवाहिका अडकली, तातडीने कारवाईची मागणी
- एटापल्लीपासून अवघ्या ४ किमीवर एकरा बु. गावातील नाल्याचा जीवघेणा प्रवास; नागरिक जीव धोक्यात घालून करत आहेत ये-जा
- डॉ. धर्मराव बाबा आत्राम : ‘समाधान शिबिर’ म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड नाही; स्कूल बस सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचे कडक निर्देश
- शेतकऱ्यांनी तातडीने Farmer ID नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
