गडचिरोली जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समिती बैठक; एसपी एम. रमेश मार्गदर्शन करताना

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड नाही; स्कूल बस सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचे कडक निर्देश

गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24
गडचिरोली, दि. २२ जुलै :  शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे आवश्यक आहे, असे स्पष्ट निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिले.

पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, विविध शाळांचे मुख्याध्यापक, पालक समितीचे प्रतिनिधी, परिवहन कंत्राटदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक शाळेत परिवहन समिती सक्रिय ठेवण्याचे निर्देश

प्रत्येक शाळा व महाविद्यालयात परिवहन समिती स्थापन करून ती नियमित कार्यरत ठेवावी. समितीने दर एक ते तीन महिन्यांनी शालेय बस, चालक, वाहक, कंत्राटदार आणि वाहनांच्या सुरक्षिततेचा आढावा घ्यावा. तसेच परिवहन कंत्राटदारांशी लेखी करार करून त्यामध्ये सुरक्षा नियमांचा स्पष्ट समावेश करावा. नियमांचे उल्लंघन झाल्यास तातडीने कारवाई करून पोलीस व परिवहन विभागाला माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले.

रस्ते सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाय

जिल्ह्यातील मागील पाच वर्षांतील अपघातांचा अभ्यास करून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. शाळांच्या परिसरात स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग, बॅरिकेड्स किंवा वाहतूक नियंत्रणाची आवश्यकता असल्यास संबंधित शाळांनी लेखी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले.

कुरखेडा व धानोरा मार्गावरील अपूर्ण किंवा निकृष्ट रस्त्यांमुळे अपघात होत असल्याचे निदर्शनास आले असून संबंधित कंत्राटदारांवर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच इंदिरा गांधी चौक परिसरातील अतिवेग रोखण्यासाठी पोलीस व परिवहन विभाग संयुक्त विशेष मोहीम राबविणार आहेत.

चालकांची पडताळणी व मद्यपानाविरुद्ध कठोर कारवाई

बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई केली जाईल. आवश्यकतेनुसार अल्कोहोल चाचणी करून दोषी चालकांचे परवाने रद्द करण्यासाठी शिफारस करण्यात येणार आहे. चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांची पोलीस पार्श्वभूमी पडताळणी करूनच त्यांची नियुक्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले.

आपत्कालीन परिस्थितीसाठी मॉक ड्रिल अनिवार्य

बसमध्ये आग लागणे, अपघात होणे किंवा वाहन बंद पडणे अशा प्रसंगी विद्यार्थ्यांनी, चालकांनी आणि वाहकांनी कसा प्रतिसाद द्यावा याचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक शाळेने वर्षातून किमान दोन ते तीन वेळा मॉक ड्रिल आयोजित करावी, असे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले.

वार्षिक बैठकीऐवजी नियमित आढावा

स्कूल बस सुरक्षितता समितीची केवळ वार्षिक बैठक न घेता निर्णयांची अंमलबजावणी तपासण्यासाठी वेळोवेळी आढावा बैठका घेतल्या जातील. तसेच तीन ते पाच महिन्यांच्या कालावधीत अचानक तपासण्या करून सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही याची पडताळणी केली जाणार आहे.

शासनाच्या नव्या नियमांची माहिती

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या १६ जुलै २०२६ रोजीच्या सुधारित अधिसूचनेतील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती दिली.

नवीन नियमांनुसार—

  • प्रत्येक स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस आणि पॅनिक बटन अनिवार्य.
  • चालक, वाहक, क्लीनर व महिला मदतनीसांची पोलीस पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी आवश्यक.
  • चालकाकडे किमान पाच वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक.
  • सहा वर्षांखालील विद्यार्थी तसेच मुलींच्या शाळांच्या वाहनात महिला कर्मचारी असणे आवश्यक.
  • बसचा रंग पिवळा असावा आणि शाळेची बस २० वर्षांपेक्षा जुनी नसावी.
  • वाहनात स्पीड गव्हर्नर, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी, आपत्कालीन दरवाजा व सीट बेल्ट असणे आवश्यक.
  • बसचा वेग ताशी ४० किलोमीटरपेक्षा अधिक नसावा.

मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या

मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व वाहनांची कागदपत्रे, विमा, प्रदूषण प्रमाणपत्र, परवाने यांची तपासणी करावी. चालकाचा फोटो, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व इतर माहिती शाळेत उपलब्ध ठेवावी. शालेय सत्र सुरू होण्यापूर्वी वाहनांची तपासणी करून निर्धारित वाहनतळांवरच वाहने थांबतील याची व्यवस्था करावी.

शाळांनी मांडल्या समस्या

बैठकीत विविध शाळांच्या प्रतिनिधींनी एसटी बसच्या अपुऱ्या फेऱ्या, शाळांच्या वेळांशी विसंगत बस वेळापत्रक, राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामांमुळे वाढणारे अपघात, शाळांसमोरील भरधाव वाहतूक तसेच स्पीड ब्रेकर व झेब्रा क्रॉसिंगच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्या समस्यांकडे लक्ष वेधले. संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

हेल्पलाइन

स्कूल बस सुरक्षिततेबाबत सूचना अथवा तक्रारींसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ९४२१००४१३३ हा हेल्पलाइन व व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून दिला असून नागरिकांनी त्याचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाच्या नव्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शाळा, वाहनचालक, पालक आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.

गडचिरोली जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समिती बैठक; एसपी एम. रमेश मार्गदर्शन करताना

शेतकऱ्यांनी तातडीने Farmer ID नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन – InfoNewsUpdate24

InfoNewsUpdate24 Telegram

FacebookWhatsAppGmailMessengerTelegram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version