गडचिरोली| प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
गडचिरोली, दि. १६ जुलै : जिल्ह्यात वाढत असलेल्या रस्ते अपघातांचे प्रमाण, प्राणांतिक अपघात आणि अपघातप्रवण ठिकाणांची गंभीर दखल घेत सर्व संबंधित विभागांनी केवळ कागदोपत्री कामकाज न करता प्रत्यक्ष ऑनफिल्ड उतरून समन्वयाने काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक प्राणांतिक अपघातानंतर पोलीस, आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त पाहणी करून तातडीने सुधारणा उपाययोजना कराव्यात. तसेच अपघातानंतरच्या ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्यावर विशेष भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या सविस्तर ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅनचे सादरीकरण केले. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील वाहनसंख्येत, विशेषतः मायनिंग ट्रकच्या संख्येत सुमारे ५० टक्क्यांनी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. एटापल्ली परिसरात दुचाकी वाहनांची संख्या पाचपट वाढल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
जिल्ह्यातील सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक अपघात होणारी १६ संवेदनशील ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी तातडीने सुधारणा उपाययोजना राबविण्यात येणार असून, प्राणांतिक अपघातांमध्ये किमान २० टक्के आणि एकूण अपघातांमध्ये ५ टक्के घट करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
यासाठी हायवे सेफ्टी टास्क फोर्सची प्रभावी अंमलबजावणी, महत्त्वाच्या मार्गांवर स्पीड कॅमेरे बसविणे, अपघातप्रवण ब्लॅक स्पॉटची सुधारणा, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन तसेच मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांविरोधात आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर द्यावा, नियमित संयुक्त पाहण्या कराव्यात आणि रस्ते सुरक्षेसाठी दीर्घकालीन उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश दिले.

