गडचिरोली| प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
जनतेची सेवा हेच पक्षाचे खरे बळ; प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवा : आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम
गडचिरोली: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा दिनांक १३.०७.२०२६ रोजी आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाच्या संघटन विस्तारासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
मेळाव्यास युवती जिल्हाध्यक्षा तथा सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, माजी पंचायत सदस्य हर्षवर्धनरावबाबा आत्राम, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, युवक जिल्हाध्यक्ष तथा नगरपरिषद गडचिरोलीचे सभापती लिलाधर भरडकर, माजी नगराध्यक्ष जेसाभाई मोटवानी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांचे तालुकाध्यक्ष, महिला पदाधिकारी, शहराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गडचिरोलीचे विवेक ब्राम्हणवाडे, आरमोरीचे बी. टी. सलोकर, वडसाचे पिंकू बावणे, कोरचीचे क्रांती केरामी, कुरखेड्याचे बी. के. लोणारे, धानोऱ्याचे सरफराज शेख, चामोर्शीचे निशांत नेताम, मुलचेराचे युधिष्ठीर बिश्वास, भामरागडचे इदरशहा मडावी, एटापल्लीचे संभा हिचामी, सिरोंचाचे मधुकर कोल्लूरी आणि अहेरीचे नागेश मडावी यांच्यासह सर्व तालुकाध्यक्षांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.
मार्गदर्शन करताना आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले की, निवडणुकीच्या काळापुरते मर्यादित न राहता वर्षभर जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे, नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावणे आणि शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. जनतेचा विश्वास जिंकणारे कार्यकर्तेच पक्षाची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना पक्षाच्या विचारांशी जोडण्यासाठी सातत्यपूर्ण जनसंपर्क आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी गावागावात नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्याचे आवाहन केले.
जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक कामाचा आढावा घेत आगामी निवडणुकांसाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनीही पक्ष बळकटीसाठी समन्वय, शिस्त आणि जनसेवा या तीन बाबींना प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली.
मेळाव्यात आगामी निवडणुकांचे नियोजन, बूथस्तरावरील संघटन मजबूत करणे, गावागावांत जनसंपर्क अभियान राबविणे, नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे आणि शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांतील पदाधिकारी, महिला आघाडी, युवक आघाडी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे मेळाव्यात आगामी निवडणुकांसाठी नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

