गडचिरोली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
गडचिरोली (प्रतिनिधी) दि. १९ जुलै : गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चांदाळा रोड परिसरातील आदिवासी गोटूल भूमीचा तब्बल ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेशी निगडित असलेल्या गोटूलसाठी १ हेक्टर जागा मंजूर करण्यात आली असून, या ठिकाणी गोटूल सभागृह उभारण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
लवकरच या सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी दिली.
या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषद, वन विभाग, वनहक्क समिती तसेच संबंधित विभागांच्या समन्वयातून आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्यात आली. त्यानंतर वन विभागामार्फत जागेचे सीमांकन करण्यात आले. यानिमित्ताने सीमा निश्चितीकरण व खांब उभारणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यामुळे आदिवासी समाजाची ओळख, परंपरा आणि संस्कृती जपणाऱ्या गोटूलच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी काळात येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य गोटूल भवनातून सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांना नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले की, “हा केवळ सीमांकनाचा कार्यक्रम नसून आदिवासी समाजाच्या ३५ वर्षांच्या संघर्षाचा विजय आहे. गोटूल ही आदिवासी संस्कृतीची ओळख असून तिचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.”
हा निर्णय आदिवासी समाजासाठी ऐतिहासिक ठरत असून, गोटूल संस्कृतीच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

चातगाव ग्रामसभेत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विकासकामांचा घेतला सविस्तर आढावा – InfoNewsUpdate24
