गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24
गडचिरोली, दि. २१ जुलै : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी कुटुंबांना शाश्वत रोजगार आणि उत्पन्नवाढीच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रेशीम संचालनालय आणि बाएफ (BAIF) यांच्या संयुक्त विद्यमाने टसर विशेष विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
यावेळी वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव अन्शु सिन्हा, रेशीम संचालक विनय मून, उपसचिव डॉ. तुषार पवार, सहायक संचालक हेमंत लाडगावकर, बाएफचे अध्यक्ष डॉ. भारत काकडे, प्रादेशिक संचालक डॉ. रविराज जाधव, सुधीर वागळे, शैलेश भगत तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पूर्व विदर्भात टसर रेशीम उत्पादनाला चालना
महाराष्ट्रात तुती आणि टसर या दोन प्रकारच्या रेशमाचे उत्पादन घेतले जाते. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये सुमारे ४४,५०० एकर क्षेत्रावर टसर मातृवृक्ष आहेत. या व्यवसायातून सुमारे ३,००० आदिवासी कुटुंबे पारंपरिक पद्धतीने उपजीविका करत आहेत.
२,२७० शेतकरी कुटुंबांना होणार थेट लाभ
या विशेष विकास प्रकल्पातून गडचिरोली जिल्ह्यातील २,२७० हून अधिक टसर शेतकरी कुटुंबांना शाश्वत उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होणार आहेत.
यामध्ये विशेषतः:
- खाजगी टसर अंडीपुंज निर्मिती केंद्रे
- बीजकोष उत्पादन
- व्यावसायिक कोष उत्पादन
- कोषोत्तर मूल्यवर्धन साखळी
- प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन
- क्षमता विकास कार्यक्रम
राबविण्यात येणार आहेत.
महिला आणि आदिवासींचे सक्षमीकरण
या प्रकल्पात अनुसूचित जमाती, महिला बचत गट आणि स्थानिक शेतकरी यांच्या कौशल्यविकासावर विशेष भर दिला जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.

- गडचिरोलीत टसर रेशीम विकास प्रकल्पाला गती; रेशीम संचालनालय आणि बाएफमध्ये सामंजस्य करार
- मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीतील ३४ दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट व्हिजन’ उपकरणांचे वाटप
- काँग्रेसचे माजी ग्रामपंचायत सदस्य सलीम शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये पक्षप्रवेश
- मिशन लक्षवेध अंतर्गत कुस्ती व रोईंग खेळाडूंसाठी निवड चाचणी; २२ व २४ जुलै रोजी पुण्यात आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान; २२ जुलै रोजी गडचिरोलीत मुख्य कार्यक्रम
