अहेरी | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
अहेरी, दि. १७ जुलै : अहेरी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगाच्या ५८ लाख रुपयांच्या निधीतून ही प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. नव्या इमारतीमुळे आरोग्य विभागाच्या प्रशासकीय कामकाजासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या असून अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक सक्षम वातावरणात काम करण्याची संधी मिळणार आहे.
लोकार्पण कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र बाबा आत्राम, तहसीलदार बालाजी सोमवंशी, गटविकास अधिकारी निलेश ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे, गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अहेरी तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३६ उपकेंद्रांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून हे कार्यालय जीर्ण व अपुऱ्या जागेतील इमारतीतून कार्यरत असल्याने प्रशासकीय कामकाजात विविध अडचणी निर्माण होत होत्या. नव्या सुसज्ज इमारतीमुळे बैठका, आरोग्य नियोजन, आढावा बैठक तसेच विविध प्रशासकीय प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होणार आहे.
या नव्या कार्यालयामुळे अहेरी तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य सेवांच्या नियोजनाला चालना मिळेल. शासकीय आरोग्य सुविधा अधिक वेगाने आणि प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही इमारत महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम म्हणाले, “तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची ही नवी इमारत आरोग्य विभागासाठी मोठी ताकद ठरेल. या माध्यमातून आरोग्य सेवांचे नियोजन अधिक परिणामकारक होईल आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत शासकीय आरोग्य सुविधा अधिक वेगाने पोहोचतील.”


