गडचिरोलीतील २२ मिनी सेतू केंद्रांचे लोकार्पण; दुर्गम भागात डिजिटल प्रशासनाला नवी दिशा
गडचिरोली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता शासनाच्या सर्व योजना दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे हेच राज्य सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. नक्षलवाद्यांनी अनेक वर्षे रोखून धरलेल्या विकासकामांना आता गती देत लोकाभिमुख प्रशासन उभारण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम व संवेदनशील भागांतील नागरिकांना शासकीय सेवा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेल्या २२ मिनी सेतू केंद्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.
या कार्यक्रमाला मुंबई येथून मुख्य सचिव राजेश अग्रवाल व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गडचिरोली येथून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश उपस्थित होते. भामरागड व एटापल्ली तालुक्यातील सर्व मिनी सेतू केंद्रांचे चालक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
नागरिकांना गावातच मिळणार शासकीय सेवा
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, लोकशाही आणि शासन व्यवस्था नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते, याचा प्रत्यक्ष अनुभव या मिनी सेतू केंद्रांमुळे आदिवासी बांधवांना मिळेल. प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा नागरिकांना त्यांच्या गावातच दिसला पाहिजे, यासाठी शासन कटिबद्ध आहे.
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी भामरागड येथील मिनी सेतू केंद्राच्या चालकाकडून सेवा वितरणाची माहिती घेतली. केंद्रावर इंटरनेट सुविधा सुरळीत असून रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, आधार सेवा तसेच विविध शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना नियमितपणे मिळत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
महिलांकडून उपक्रमाचे स्वागत
आरेवाडा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांनी सांगितले की, मिनी सेतू केंद्र सुरू झाल्यानंतर गावातील नागरिकांना जन्मदाखला, उत्पन्न दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज उरलेली नाही. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रमाची मोठी बचत होत असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ठळक मुद्दे
- ✅ गडचिरोलीतील २२ मिनी सेतू केंद्रांचे लोकार्पण
- ✅ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकासावर भर
- ✅ दुर्गम भागात गावपातळीवर शासकीय सेवा उपलब्ध
- ✅ रहिवासी, उत्पन्न, आधारसह विविध सेवा एका ठिकाणी
- ✅ आदिवासी भागात डिजिटल प्रशासनाला चालना
- ✅ नक्षलवादामुळे रखडलेल्या योजनांना मिळणार गती

District Gadchiroli, Government of Maharashtra | The Forest District of Maharashtra State | India
