शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत विकासाचा रस्ता! बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेबाबत आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
अहेरी | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
अहेरी (प्रतिनिधी) दि. २० जुलै : मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना अंतर्गत अहेरी विधानसभा क्षेत्रातील सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील विविध विकासकामांचे नियोजन करण्यासाठी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची सविस्तर आढावा बैठक पार पडली.
बैठकीत अहेरी, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा आणि सिरोंचा या पाचही तालुक्यांतील शेतकऱ्यांना योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा, यासाठी क्लस्टरनिहाय नियोजन, प्राधान्यक्रम निश्चिती, अतिक्रमणमुक्त मार्गांची निवड तसेच दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले.
यावेळी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितले की, शेतापर्यंत बारमाही पाणंद रस्ते उपलब्ध झाल्यास शेतीमालाची वाहतूक सुलभ होते, उत्पादन खर्चात बचत होते, कृषी यंत्रसामग्रीची ने-आण सुलभ होते आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. त्यामुळे या योजनेतील प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
तसेच शेतकऱ्यांचा विश्वास कायम ठेवत अहेरी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास आणि शेतीला बळकटी देण्याचा संकल्प शासनाच्या माध्यमातून सातत्याने पूर्ण केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

