गडचिरोली| प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
गडचिरोली, दि. १७ जुलै : पावसाळ्यात शेतीची कामे वाढणे आणि सापांच्या बिळांमध्ये पाणी साचल्यामुळे सापांचा मानवी वस्ती व शेतांमधील वावर वाढतो. गडचिरोली जिल्ह्याचे जंगल क्षेत्र मोठे असल्याने नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी आणि सर्पदंश झाल्यास कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा झाडफुकीवर विश्वास न ठेवता त्वरित जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्पदंश प्रतिबंधक अँटी स्नेक व्हेनम (ASV) औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील आरोग्य यंत्रणाही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सर्पदंशाच्या घटनांमध्ये दरवर्षी चढ-उतार दिसून येत आहेत. जिल्ह्यात २०२३ मध्ये ५४२, २०२४ मध्ये ४७९ आणि २०२५ मध्ये ५८० सर्पदंशाच्या घटना नोंदल्या गेल्या. तर जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत १३४ घटनांची नोंद झाली आहे.
सध्या जिल्ह्यातील १ जिल्हा रुग्णालय, ३ उपजिल्हा रुग्णालये, १२ ग्रामीण रुग्णालये आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मिळून ६,१८२ ASV डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरगुती उपचार किंवा भोंदूगिरीच्या मागे वेळ व पैसा खर्च न करता शासकीय रुग्णालयातील मोफत उपचारांचा लाभ घ्यावा, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सांगितले की, सर्पदंश झालेल्या व्यक्तीला पहिल्या एका तासात म्हणजेच **’गोल्डन अवर’**मध्ये उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य वेळी उपचार सुरू झाल्यास जीवितहानी टाळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता रुग्णाला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करणे हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्पदंश टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी :
- शेतात किंवा जंगलात काम करताना बूट व हातमोजे वापरावेत.
- रात्री टॉर्चशिवाय बाहेर जाऊ नये.
- घराच्या परिसरातील गवत व झुडपे नियमित साफ ठेवावीत.
- सर्पदंश झाल्यास जखमेवर कापणे, बांधणे किंवा झाडफूक करणे टाळावे.
- रुग्णाला शांत ठेवून तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात घेऊन जावे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवण्याचे आणि वेळेत उपचार घेऊन सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

Join Telegram
