गडचिरोली, दि. २८ जुलै : गडचिरोली जिल्ह्यात माओवादी असल्याचा बनाव करून बॅनर व पत्रके टाकत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात माओवाद संपुष्टात आल्याची स्थिती असताना काही असामाजिक घटकांकडून माओवादाच्या नावाखाली नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणाचा तातडीने तपास करून संबंधित सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नक्षल सप्ताह किंवा माओवादाच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या अफवा, भूलथापा आणि दिशाभूल करणाऱ्या कृत्यांवर विश्वास ठेवू नये. संशयास्पद हालचाली, बॅनर, पत्रके किंवा अशा प्रकारची कोणतीही माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास कळवावी.
गडचिरोली पोलीस दलाच्या “ऑपरेशन अंतिम प्रहार” या मोहिमेमुळे जिल्ह्यातील माओवाद पूर्णपणे संपुष्टात आला असून, पोलीस अभिलेखावर एकही सशस्त्र माओवादी शिल्लक नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे माओवादाच्या नावाखाली भीती निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नसून अशा प्रत्येक व्यक्तीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
गडचिरोली जिल्हा माओवादाचा भूतकाळ मागे टाकून विकासाच्या नव्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे जात असून नागरिकांनी अफवांना बळी न पडता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

स्रोत : गडचिरोली पोलीस दल / पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली.
