देवाजी तोफा यांच्या पुढाकाराने ग्रामसभा लेखा (मेंढा) येथे बैठक; ग्रामसभांच्या हक्क-अधिकारांसाठी प्रश्नावली तयार करून सरकार व राज्यपालांना देणार
धानोरा (जि. गडचिरोली), दि. २८ ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे चौदाशे ग्रामसभा सक्षमीकरणासाठी ग्रामसभा लेखा (मेंढा) येथील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांच्या पुढाकाराने कोरची ते सिरोंचा अशी विराट ग्रामसभा यात्रा काढण्याचा निर्धार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामसभांचे हक्क व अधिकार याबाबत जनजागृती करणे आणि ग्रामसभांसमोरील समस्या संकलित करून त्या सरकार व राज्यपालांपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
ग्रामसभा कार्यालय, लेखा (मेंढा) येथे यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांच्यासह ग्रामसभा पुसेर इलाका येथील ग्रामसभांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बैठकीत “मावा नाटे, मावा राज” तसेच “जल, जंगल, जमीन, हमारा है” या विचारांना केंद्रस्थानी ठेवून ग्रामसभा सक्षमीकरणासाठी व्यापक पातळीवर काम करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
देवाजी तोफा व उपस्थित कार्यकर्त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्रामसभांना त्यांचे संविधानिक व कायदेशीर हक्क-अधिकार यांची माहिती व्हावी, यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची भूमिका मांडली.
बैठकीत “ना मंत्रालय, ना मिनी मंत्रालय; सबसे बड़ा गाँव का ग्रामसभा मंत्रालय” या भूमिकेवरही चर्चा झाली. ग्रामसभा ही स्थानिक पातळीवरील महत्त्वपूर्ण आणि सर्वोच्च लोकसहभागाची व्यवस्था असून तिच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
ग्रामसभांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रश्नावली
प्रस्तावित विराट ग्रामसभा यात्रेदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील ग्रामसभांना भेट देऊन त्यांच्या समस्या, अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या जाणार आहेत. या समस्यांच्या आधारे एक सविस्तर प्रश्नावली तयार करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
ही प्रश्नावली केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच राज्यपाल महोदय यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. ग्रामसभांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघेपर्यंत प्रयत्न सुरू ठेवण्याची भूमिका उपस्थितांनी व्यक्त केली.
गडचिरोली ग्रामसभा यात्रा हक्क-अधिकारांच्या जनजागृतीसाठी
कोरची ते सिरोंचा या विस्तृत भागात काढण्यात येणाऱ्या यात्रेमुळे जिल्ह्यातील विविध ग्रामसभांशी थेट संवाद साधण्यास मदत होणार आहे. ग्रामसभा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना त्यांच्या हक्क व अधिकारांबाबत जागृत करून स्थानिक प्रश्नांना एकत्रितपणे वाचा फोडण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येणार आहे.
या बैठकीस डॉ. प्रणय खुणे, केसरी पाटील मट्टामी, मधुकर कोवासे, सुरज पोटावी, कोमटी नरोटे, ग्रामसभा अध्यक्ष रामू हेडो, इलाका सचिव नामदेव मट्टामी, हरीश कुमरे, ग्रामसभा सचिव सुधाकर तुमरेटी, रमेश अधिकारी, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भीमराव वनकर तसेच भामरागड तालुका मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
InfoNewsUpdate24 (@infonewsupdate24) • Instagram photos and videos
