गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24
गडचिरोली, दि. २४ जुलै : गडचिरोली जिल्ह्यात कृषी विभागाच्या अनुदान (सबसिडी) योजनेच्या नावाखाली ट्रॅक्टर विक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. नव्याने ट्रॅक्टर खरेदी केलेल्या शेतकऱ्यांनी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे निवेदन सादर करून फसवणुकीची तक्रार केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी, ट्रॅक्टर डीलर आणि एजंट यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी डॉ. होळी यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, काही एजंट, ट्रॅक्टर डीलर तसेच कृषी विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कृषी विभागामार्फत ट्रॅक्टरवर मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळणार असल्याचे सांगितले. त्यानुसार शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेण्यात आले आणि ट्रॅक्टरचे वितरणही करण्यात आले. मात्र, ट्रॅक्टर घेतल्यानंतर अनेक महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याची जाणीव शेतकऱ्यांना झाली.
या पार्श्वभूमीवर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी जिल्ह्यातील आदिवासी व गैरआदिवासी शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी संबंधित योजनेची अधिकृत व लेखी माहिती कृषी विभागाकडून घ्यावी, सबसिडीची मंजुरी तपासावी आणि सर्व कागदपत्रांची खात्री करूनच ट्रॅक्टरची उचल करावी, असे त्यांनी सांगितले.
तसेच, कोणताही ट्रॅक्टर डीलर किंवा एजंट चुकीची माहिती देऊन अथवा दबाव टाकून ट्रॅक्टर घेण्यास भाग पाडत असल्यास संबंधित पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार दाखल करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबंधित अधिकारी, ट्रॅक्टर डीलर आणि एजंट यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी तसेच दोषींना अटक करण्यात यावी, अशी मागणी डॉ. होळी यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. या प्रकरणात दोषींना संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी रायपूर येथील आदिवासी शेतकरी मंगल मडावी, राजू मडावी, एका बोका, रघुराज तिर्की, भास्कर भांडेकर यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.

FAQ
1. गडचिरोलीतील ट्रॅक्टर सबसिडी प्रकरण काय आहे?
काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर सबसिडी मिळेल असे सांगून ट्रॅक्टर विक्री करण्यात आली, मात्र अनुदान मिळाले नसल्याची तक्रार केली आहे.
2. या प्रकरणात कोणावर आरोप आहेत?
तक्रारीनुसार काही एजंट, ट्रॅक्टर डीलर तसेच कृषी विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आरोप करण्यात आले आहेत.
3. डॉ. देवराव होळी यांनी काय मागणी केली आहे?
संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
4. शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
कोणतीही सबसिडी योजना स्वीकारण्यापूर्वी अधिकृत मंजुरी, लेखी माहिती आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी.
Official Website: www.infonewsupdate24.com
- एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी हद्दीत माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके लावणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली अटक
- गडचिरोलीचा सुपुत्र शहीद; भारत-बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावताना बीएसएफ जवान सुरेश आंबाडर यांचे वीरमरण
- गडचिरोलीत सबसिडीच्या नावाखाली ट्रॅक्टर विक्रीचा गोरखधंदा? शेतकऱ्यांची फसवणुकीची तक्रार; दोषींवर कारवाईची डॉ. देवराव होळी यांची मागणी
- मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट; १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
- आरमोरीत बारदाना निर्मिती उद्योगाचे उद्घाटन; महिला सक्षमीकरणासाठी शाश्वत रोजगार क्लस्टर उभारणीवर भर
