गडचिरोली| प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
गडचिरोली, दि. १७ जुलै : गडचिरोली नगर परिषदेतील शिक्षक भरती प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप नगरसेवक तथा शिक्षण समिती सदस्य बाळू टेंभुर्णे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांची भेट घेऊन सविस्तर तक्रार सादर केली असून, संबंधित भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून नव्याने पारदर्शक पद्धतीने भरती घेण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, गडचिरोली नगर परिषदेने विविध विभागांसाठी मनुष्यबळ पुरविणाऱ्या मे. यशश्री एंटरप्राईजेस, सोलापूर या संस्थेशी ई-निविदेद्वारे २८ एप्रिल २०२६ रोजी करार केला होता. त्यानंतर नगर परिषदेच्या शाळांमध्ये नववी, दहावी तसेच इतर वर्गांसाठी कंत्राटी शिक्षक भरती करण्याचा ठराव ३० जून २०२६ रोजी झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
मात्र, ठराव मंजूर होण्यापूर्वीच २९ जून २०२६ रोजी कोणतीही सार्वजनिक जाहिरात न देता, शासनाच्या नियम व निकषांकडे दुर्लक्ष करून काही निवडक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच संबंधित एजन्सीलाही या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
बाळू टेंभुर्णे यांच्या म्हणण्यानुसार, शिक्षण समितीचे सभापती, शिक्षण विभागाचे प्रमुख आणि नगर परिषद शाळांतील दोन मुख्याध्यापक यांनी कोणताही अधिकृत आदेश नसताना मुलाखत प्रक्रियेत सहभाग घेतला. तसेच सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली ही प्रक्रिया पार पडल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तक्रारीत पुढे असा दावा करण्यात आला आहे की, सुमारे १८ उमेदवारांना लेखी नियुक्तीपत्र न देता तोंडी आदेशाद्वारे रुजू होण्यास सांगण्यात आले, तसेच नियुक्तीचे कोणतेही अधिकृत दस्तऐवज नसतानाही त्यांनी काम सुरू केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने पारदर्शक पद्धतीने भरती घेण्यात यावी, संबंधित मुख्याधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच करारातील निष्काळजीपणाबाबत मे. यशश्री एंटरप्राईजेस या संस्थेचे कंत्राटही रद्द करण्यात यावे, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
या आरोपांबाबत नगर परिषद प्रशासन, संबंधित पदाधिकारी किंवा सत्ताधारी पक्षाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप उपलब्ध झालेली नाही. प्रतिक्रिया प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

Join Telegram
