एटापल्ली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
एटापल्ली तालुक्यातील जारावंडी व सेवारी ग्रामपंचायतींमध्ये कथित प्रशासकीय अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार, विकासकामांतील त्रुटी आणि ग्रामस्थांच्या प्रलंबित प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.
निवेदनानुसार, सेवारी ग्रामपंचायतीतील मागील तीन वर्षांतील आर्थिक व्यवहार व विकासनिधीची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. तसेच जारावंडी ग्रामपंचायतीत कार्यरत ग्रामसेवक मनोज गेडाम यांच्या कार्यकाळातील आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये नियमित व पूर्णवेळ ग्रामसेवकांची नियुक्ती करून ग्रामस्थांची प्रलंबित प्रशासकीय कामे तातडीने मार्गी लावावीत, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, यापूर्वीही ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी, निवेदने आणि स्मरणपत्रे सादर केली होती. मात्र, अपेक्षित कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी निर्माण झाली असून, लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास कमी होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित आर्थिक कागदपत्रे, अभिलेख आणि विकासकामांच्या नोंदी सुरक्षित ठेवाव्यात तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी किंवा संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच चौकशीचा अहवाल निश्चित कालमर्यादेत सादर करून त्यानुसार त्वरित कार्यवाही करावी. अन्यथा जनतेच्या भावना लक्षात घेऊन लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या प्रकरणात कार्यकारी तालुका अध्यक्ष मनीष दुर्गे यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

