गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाज, विद्यार्थी आणि युवकांसाठी महत्त्वाची दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र अनुसूचित जमाती सल्लागार परिषदेच्या बैठकीत गडचिरोलीची जात पडताळणी समिती जिल्ह्यातच कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेले मोठे यश मानले जात आहे.
डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना, युवकांना आणि नागरिकांना जात पडताळणीसाठी इतर जिल्ह्यांत जावे लागू नये, यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळे गडचिरोलीची जात पडताळणी समिती जिल्ह्यातच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना, नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या आदिवासी नागरिकांना जात पडताळणीसाठी इतर जिल्ह्यांत जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत होणार आहे.
यासोबतच गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी पट्टेधारकांसाठीही मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. अतिक्रमित जमिनीबाबत पात्र पट्टेधारकांपैकी ज्यांच्याकडे सातबारा उपलब्ध आहे, त्यांना एका महिन्याच्या आत मालकी हक्क प्रदान करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तर ज्यांच्याकडे सातबारा उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी सहा महिन्यांच्या आत सातबारा तयार करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
या निर्णयाबाबत डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी, विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी माझा संघर्ष यापुढेही कायम राहील.”
जात पडताळणी समिती कायम ठेवण्याचा निर्णय आणि आदिवासी पट्टेधारकांना मालकी हक्क देण्याची प्रक्रिया वेगाने राबविण्याच्या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील हजारो आदिवासी कुटुंबांना थेट लाभ होणार असून, या दोन्ही निर्णयांचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे. आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे महत्त्वपूर्ण फलित असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

