गडचिरोली-gadchiroli nqas state level accreditation health centres

गडचिरोलीची राष्ट्रीय दर्जाच्या NQAS मूल्यांकनात उल्लेखनीय कामगिरी; ११ आरोग्य संस्थांना राज्यस्तरीय मानांकन

गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24
गडचिरोली, दि. २३ जुलै :  राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS) राज्यस्तरीय मूल्यांकनात गडचिरोली जिल्ह्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे. राज्य कौटुंबिक कल्याण ब्युरो, पुणे यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार जिल्ह्यातील १ उपजिल्हा रुग्णालय, १ ग्रामीण रुग्णालय आणि ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह एकूण ११ आरोग्य संस्थांना NQAS राज्यस्तरीय मानांकन प्राप्त झाले आहे. दुर्गम व आदिवासीबहुल भागात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांची ही महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या यशाबद्दल आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, गडचिरोलीसारख्या भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक जिल्ह्यातही गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याची क्षमता आरोग्य यंत्रणेने सिद्ध केली आहे. या मानांकनामुळे नागरिकांना अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार असून आता राष्ट्रीय मानांकन मिळविण्यासाठीही याच समर्पणाने प्रयत्न करण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सांगितले की, या यशामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आत्मविश्वास वाढला आहे. भविष्यात जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांचा NQAS प्रक्रियेत समावेश करून त्यांच्या सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील.

NQAS म्हणजे काय?

National Quality Assurance Standards (NQAS) ही भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेली सार्वजनिक आरोग्य संस्थांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करणारी राष्ट्रीय प्रणाली आहे. या प्रक्रियेत आरोग्य सेवा, रुग्णाभिमुख सुविधा, स्वच्छता, संसर्ग नियंत्रण, व्यवस्थापन आणि रुग्ण समाधान अशा विविध निकषांवर तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष पाहणी करून गुणांकन केले जाते.

आठ निकषांवर होते मूल्यांकन

NQAS अंतर्गत सेवांची उपलब्धता, रुग्णांचे हक्क, निदान सेवा, रुग्ण सहाय्य सेवा, वैद्यकीय सेवेचा दर्जा, संसर्ग नियंत्रण व स्वच्छता, गुणवत्ता व्यवस्थापन तसेच रुग्णांचे समाधान या आठ प्रमुख निकषांवर मूल्यांकन केले जाते. राज्य किंवा राष्ट्रीय मानांकनासाठी प्रत्येक विभागात आणि एकूण गुणांमध्ये किमान ७० टक्के गुण आवश्यक असतात.

मानांकन प्राप्त आरोग्य संस्था

राज्यस्तरीय मानांकन मिळालेल्या संस्थांमध्ये अहेरी उपजिल्हा रुग्णालय, धानोरा ग्रामीण रुग्णालय तसेच कुंघाडा, घोट, आरेवाडा, भेंडाळा, लखमापूर बोरी, देलनवाडी, महागाव, कुरुड आणि आलापल्ली या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

राष्ट्रीय मानांकनाचे पुढील लक्ष्य

उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळाले आहे. पुढील टप्प्यात सर्व ११ आरोग्य संस्था केंद्र शासनाच्या सक्षम’ पोर्टलवर राष्ट्रीय मानांकनासाठी अर्ज करणार आहेत. राष्ट्रीय मानांकन मिळाल्यानंतर केंद्र शासनाकडून विशेष प्रोत्साहन अनुदान उपलब्ध होणार असून त्याचा उपयोग रुग्णाभिमुख सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी केला जाणार आहे.

गुणवत्ता कक्षाचे मोलाचे योगदान

या यशामध्ये जिल्हास्तरीय NQAS गुणवत्ता कक्षाचे तांत्रिक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. वरिष्ठ सल्लागार (दक्षता) डॉ. अनुपम महेशगौरी, गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. शिल्पा खोब्रागडे, डॉ. दीक्षांत मेश्राम, डॉ. अपूर्वा आकरे तसेच कार्यक्रम सहाय्यक वैशाली चौधरी यांनी प्रशिक्षण, दस्तऐवजीकरण आणि गुणवत्ता प्रक्रियेच्या अंमलबजावणीत मोलाचे योगदान दिले.

गडचिरोली-gadchiroli nqas state level accreditation health centres

डॉ. धर्मराव बाबा आत्राम : ‘समाधान शिबिर’ म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ – InfoNewsUpdate24

GADCHIROLI DISTRICT

MAHARASTHRA GOVERNMENT

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *