el niño एल निनोचा संभाव्य प्रभाव

El Niño एल निनोचा संभाव्य प्रभाव; पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने पीक विमा भरावा – कृषी विभाग

गडचिरोली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
यंदाच्या खरीप हंगामात एल निनो (El Niño) च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची तसेच पावसात दीर्घ खंड पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील धानासह इतर खरीप पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तातडीने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, एल निनोमुळे हवामानात मोठी अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर होऊ शकतो. अशा परिस्थितीत पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आर्थिक सुरक्षा कवच ठरू शकतो.

नैसर्गिक आपत्तींविरुद्ध आर्थिक संरक्षण

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पावसातील खंड, पूर, दुष्काळ, भूस्खलन, वीज कोसळणे तसेच कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी नियमानुसार नुकसानभरपाई दिली जाते. त्यामुळे बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पात्र शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घ्यावा, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

अशा प्रकारे भरता येईल पीक विमा

शेतकरी खालील माध्यमांतून पीक विमा नोंदणी करू शकतात:

  • ग्रामस्तरावरील सामाईक सेवा केंद्र (CSC)
  • संबंधित बँक शाखा
  • PMFBY अधिकृत पोर्टल
  • Crop Insurance App द्वारे ऑनलाइन नोंदणी

कृषी विभागाचे आवाहन

एल निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून कोणताही धोका न पत्करता प्रत्येक पात्र शेतकऱ्याने आपल्या पिकाचा विमा काढावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा विस्तार; लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा – InfoNewsUpdate24

Pradhan Mantri Fasal Bima Yojana – Crop Insurance | PMFBY – Crop Insurance

el niño एल निनोचा संभाव्य प्रभाव

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *