गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24
गडचिरोली, दि. २१ जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद गडचिरोली आणि महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित ‘स्मार्ट व्हिजन’ उपकरणांचे वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते ३४ दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना या अत्याधुनिक उपकरणांचे वितरण करण्यात आले.
‘महाराष्ट्र स्टार्टअप वीक’ स्पर्धेतील विजेत्या डीप व्हिजन टेक या स्टार्टअप कंपनीने विकसित केलेले हे स्मार्ट व्हिजन उपकरण दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना दैनंदिन जीवनात मोठी मदत करणारे ठरत आहे. जिल्हा परिषदेला या उपक्रमांतर्गत एकूण ५० उपकरणे प्राप्त झाली असून, पहिल्या टप्प्यात ३४ विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ देण्यात आला.
वाटप कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना उपकरणाच्या वापराबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रवास आणि दैनंदिन जीवनातील विविध कामे अधिक आत्मविश्वासाने करता येणार आहेत.
स्मार्ट व्हिजन उपकरणाची वैशिष्ट्ये
- 👁️ समोरील वस्तू व अडथळ्यांची ध्वनीद्वारे माहिती
- 📚 पुस्तके, वर्तमानपत्रे व इतर मुद्रित मजकूर वाचून दाखवते
- 💵 चलनी नोटांची ओळख
- 👥 परिचित व्यक्तींची ओळख
- 🛰️ GPS च्या सहाय्याने मार्गदर्शन
- 🤖 कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक तंत्रज्ञान
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे उपकरणांच्या खरेदीचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी करणार असून जिल्हा परिषद गडचिरोलीवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी चेतन हिवंज यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक सहभाग अधिक सक्षम होणार असून विद्यार्थी व पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

- गडचिरोलीत टसर रेशीम विकास प्रकल्पाला गती; रेशीम संचालनालय आणि बाएफमध्ये सामंजस्य करार
- मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीतील ३४ दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट व्हिजन’ उपकरणांचे वाटप
- काँग्रेसचे माजी ग्रामपंचायत सदस्य सलीम शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये पक्षप्रवेश
- मिशन लक्षवेध अंतर्गत कुस्ती व रोईंग खेळाडूंसाठी निवड चाचणी; २२ व २४ जुलै रोजी पुण्यात आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान; २२ जुलै रोजी गडचिरोलीत मुख्य कार्यक्रम
