गडचिरोली | प्रतिनिधी : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील वसतिगृहात झालेल्या सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू, तर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, एटापल्लीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चौकशीत प्रशासनिक निष्काळजीपणा किंवा शाळा व्यवस्थापन, संबंधित अधिकारी, कर्मचारी अथवा अन्य कोणाचीही जबाबदारी निश्चित झाल्यास संबंधितांविरुद्ध लागू कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी किमान ५० लाख रुपयांची शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी, तर गंभीर जखमी झालेल्या तीन विद्यार्थिनींना प्रत्येकी किमान २० लाख रुपयांची विशेष आर्थिक मदत देऊन त्यांच्या पुढील उपचारांचा संपूर्ण खर्च शासनाने करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जपतलाई येथील घटना केवळ एका आश्रमशाळेपुरती मर्यादित न ठेवता गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा आणि वसतिगृहांची तातडीने विशेष सुरक्षा तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही परिषदेकडून करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये वसतिगृहांची स्थिती, स्वच्छता, सर्पप्रतिबंधक उपाययोजना, विद्यार्थ्यांची झोपण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन संपर्क व्यवस्था आणि रात्रीची देखरेख यांचा सखोल आढावा घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सर्पदंशासह इतर आपत्कालीन घटनांसाठी प्राथमिक उपचार, आवश्यक औषधे, तातडीची रुग्णवाहिका किंवा वाहतूक व्यवस्था आणि जवळच्या रुग्णालयाशी समन्वयाची सुविधा उपलब्ध आहे की नाही, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना पोलीस अधीक्षक रमेश साहेब यांनी मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणली जाईल आणि चौकशीत जो कोणी दोषी आढळेल, त्याच्याविरुद्ध नियमानुसार FIR दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच निवासी अपर जिल्हाधिकाऱ्यांनीही निवेदनातील मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत, प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थितीच्या आधारे आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी भूमिका व्यक्त केल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले.
प्रशासनाने घेतलेली सकारात्मक भूमिका स्वागतार्ह असल्याचे सांगत, या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ चौकशी होऊन प्रत्यक्ष जबाबदार व्यक्तींची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी अपेक्षा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून व्यक्त करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे जीवन कोणत्याही प्रशासकीय प्रक्रियेपेक्षा अधिक महत्त्वाचे असल्याने, केवळ चौकशीपुरते प्रकरण मर्यादित न ठेवता दोषींवर कायदेशीर कारवाई, मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना योग्य आर्थिक मदत, जखमी विद्यार्थिनींच्या उपचारांचा खर्च आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आश्रमशाळांमध्ये कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी परिषदेकडून कायम ठेवण्यात आली आहे.
निवेदन देताना अधिवक्ता राकेश तोरे, युवा प्रदेश सचिव (महाराष्ट्र राज्य), अधिवक्ता गिरीश जोगे, युवा तालुकाध्यक्ष एटापल्ली, मारोती बारसागडे, जनहितवादी समिती, स्वप्निल मडावी, सोशल मीडिया प्रमुख आणि संजय वेळदा, सदस्य उपस्थित होते.
स्रोत : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, एटापल्ली यांचे प्रसिद्धीपत्रक.
एटापल्लीत ‘हर घर तिरंगा’ आणि ‘वंदे मातरम्’ उपक्रमांचा उत्साहात समारोप – InfoNewsUpdate24

