एटापल्लीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना तहसीलदार श्री. हेमंत गांगुर्डे आणि मुसळधार पावसामुळे बंद झालेला रस्ता

एटापल्लीत मुसळधार पावसाचा कहर; अनेक प्रमुख मार्ग बंद, तहसीलदार श्री. हेमंत गांगुर्डे यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी

एटापल्ली | दि. ३० जुलै
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पूरस्थितीमुळे प्रशासनाने सतर्कता बाळगत विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला असून मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

पूराच्या पाण्यामुळे आलापल्ली–एटापल्ली मार्ग, हेडरी मार्ग तसेच कसनसूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच एटापल्ली नाका परिसरातही खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, एटापल्लीचे तहसीलदार श्री. हेमंत गांगुर्डे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह डुम्मे रोड आणि आनंदनगर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. पूरामुळे अडकलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका करत तहसील प्रशासनाने तातडीने मदतकार्य राबविले. प्रशासनाकडून पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.

याशिवाय, नेंडेर गावाजवळील रस्त्यावरील पूल पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे वाहून गेल्याने त्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

प्रशासनाने नागरिकांना पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे, नदी-नाल्याजवळ न जाण्याचे तसेच केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

गडचिरोलीत महिंद्रा ट्रॅक्टर सर्व्हिस मेकॅनिक प्रशिक्षणामुळे युवकांना रोजगाराची नवी दिशा; १७ जणांना नियुक्ती – InfoNewsUpdate24

Follow Click Here

FacebookWhatsAppGmailMessengerTelegram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version