
सुरजागड ते गट्टा रस्त्याच्या कामाला सुरुवात; नागरिकांना दिलासा
एटापल्ली (गडचिरोली) –
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड ते गट्टा या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाल्याने वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत हिवाळी अधिवेशनात माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन धर्मरावबाबा आत्राम यांनी निवेदन तयार करून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे मागणी सादर केली होती. या निवेदनात सुरजागड ते गट्टा रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची ठोस मागणी करण्यात आली होती.
या मागणीची दखल घेत प्रशासनाने त्वरित पावले उचलत रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. सुरजागड ते नेंडेर या टप्प्यातील रस्त्यावर असलेले मोठे खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून त्यामुळे वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत झाली आहे.
या कामामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना तसेच स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी बेबीताई लेकामी, राजू नरोटे, लक्ष्मण नरोटे, गिरिश नरोटे, उमेश हिचामी, झारेवाडा येथील उपसरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सुरजागड–गट्टा रस्त्याच्या कामामुळे परिसरातील दळणवळण सुलभ होऊन आर्थिक व सामाजिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.